ओडिशा येथील बालोसोर येथे झालेल्या रेल्वेअपघातात २७८हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर ११०० जण जखमी झाले. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांसाठी भारतीय फुटबॉल संघाने २० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी लेबानन संघावर २-० असा विजय मिळवताना Intercontinental Cup जिंकला. सुनील छेत्रीने ८७व्या मिनिटाला गोल केला, तर लालिआंझुआला छांग्टेनेही एक गोल करून विजयात हारभार लावला.
या ऐतिहासिक विजयानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भारतीय संघासाठी १ कोटींचे बक्षीस जाहीर केले. “ आमच्या विजयासाठी संघाला रोख बक्षीस देणाऱ्या ओडिशा सरकारचे आम्ही आभारी आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला ओडिशा राज्यातील दुर्दैवी रेल्वे अपघातामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसाठी मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी २० लाख रुपये दान करण्याचा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सामूहिक निर्णय घेतला आहे,'' असे भारतीय फुटबॉल संघाने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे.
"लोकांना झालेल्या नुकसानीची भरपाई कशानेच होणार नाही, परंतु आम्हाला आशा आहे की कुटुंबांना खूप कठीण काळात सामोरे जाण्यास मदत करण्यात ही छोटीशी भूमिका बजावेल," असे त्यात म्हटले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ओडिशा सरकारचे आभार मानले. “आम्हाला यापेक्षा चांगले ठिकाण मिळू शकले नसते आणि हिरो इंटरकॉन्टिनेंटल चषक संपला असता. सहभागी संघांना सर्व सहकार्य आणि आदरातिथ्य दिल्याबद्दल मी ओडिशा सरकारचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.