अमृतसर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या मानसिक त्रासाचा सामना करत आहे. सिद्धू यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. नवज्योतसिंग सिद्धू अलीकडेच रोड रेज प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आले असून आपल्या पत्नीची काळजी घेत आहेत. पत्नी नवज्योत कौर यांना स्वतःच्या हाताने जेवू घालतानाचे फोटो त्यांनी शेअर केले असून एक भाविनक संदेश देखील लिहला आहे.
१९ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना रोड रेज प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षेचा कालावधी पूर्ण होत असतानाच सिद्धू यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. ते एप्रिलमध्ये तुरुंगात असताना त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांना कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सिद्धू भावुक तुरूंगातून बाहेर आल्यापासून काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू आपल्या पत्नीसोबत सावलीसारखे उभे आहेत. डॉ.नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर आतापर्यंत पाच केमोथेरपी उपचार झाले आहेत. दरम्यान, सिद्धूंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भावनिक पोस्टसह फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सिद्धू आपल्या पत्नीला स्वत:च्या हाताने जेवण भरवताना दिसत आहे.
सिद्धू यांनी पोस्टमध्ये म्हटले, "घाव बरा झाला आहे पण या परीक्षेच्या मानसिक जखमा अजूनही कायम आहेत. आता ५वी केमो चालू आहे, काही कालावधी तर चांगली नस शोधण्यातच व्यर्थ गेला. पण, नंतर डॉ. रुपिंदरचे कौशल्य कामी आले. डॉक्टरांनी पत्नीला हात हलवायला नकार दिला म्हणून मी स्वतः चमच्याने तिला खाऊ घातले. शेवटच्या केमोनंतरची स्थिती लक्षात घेऊन… कडक उन्हामुळे तिला मनालीला घेऊन जाण्याची वेळ आली आहे."