नवी दिल्ली :भारतीय उद्योगांनी जोखीम घेण्याची भूक वाढवून गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. त्याचवेळी उद्योगपतींनी व्याजदरात कपात करावी आणि व्यवसाय करणे सुलभ होण्यासाठी आणखी धोरणे राबविली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, बँकर्स, अर्थतज्ज्ञ आणि नोकरशहांनी भेट घेतल्यानंतर मोदी यांनी उद्योगांनी जोखीम घेतलीच पाहिजे व गुंतवणूक वाढविली पाहिजे, असे म्हटले, अशी माहिती भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष सुमीत मझुमदार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितली.या भेटीत अनेक उद्योगांतील नेत्यांनी व्याजदर कपातीच्या मागणीवर भर दिला. व्याजदर कपात झाल्यास आम्हाला गुंतवणुकीची जोखीम घ्यायला व गुंतवणूक वाढवायला मदत मिळेल, असाही युक्तिवाद त्यांनी केला. आमच्यापैकी अनेकांनी व्याजदर कपातीचा मुद्दा उपस्थित केल्याचे फिक्कीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना सुरी म्हणाल्या.भांडवली खर्च कमी करावा, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करावी व नव्याने उद्योग करू पाहणाऱ्यांना कर प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती आम्ही मोदी यांना केली, असे ज्योत्स्ना सुरी म्हणाल्या. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा ग्रुपचे प्रमुख सायरस मिस्त्री, आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रमुख कुमारमंगलम बिर्ला, भारती एअरटेलचे सुनील मित्तल व आयटीसीचे वाय. सी. योगेश्वर आदी उपस्थित होते.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, वीजमंत्री पीयूष गोयल, तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते. मोदी यांनी ही वेळ गुंतवणुकीचा लाभ घेण्याची व गुंतवणुकीची असल्याचे सांगितले. जोखीम घेण्याची क्षमता वाढवा, असे मोदींनी म्हटल्याचे असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर म्हणाले. आर्थिक विकासासाठी बँकांकडील भांडवलाची गरज आणि बुडीत संपत्तीचे विभाजन हे विषयदेखील यावेळी चर्चेत होते.वस्तू आणि सेवाकराच्या अंमलबजावणीचा मुद्दा आला त्यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ते राबविले जाईल, अशी आशा व्यक्त केली.यावेळी भूसंपादन विधेयक चर्चेस आले नाही, असे मझुमदार म्हणाले. उद्योग, व्यवसाय करणे सोपे जावे व अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उद्योगातील मंडळींनी अनेक सूचनाही केल्या. चीनमधील अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या गतीवरही चर्चा झाली. जगातील सध्याची परिस्थिती संधीमध्ये कशी बदलून घेता येईल व व्यवसाय व कृषी क्षेत्राला चालना कशी देता येईल याचीही चर्चा झाली, असे मझुमदार म्हणाले.
भारतीय उद्योगांनी जोखीम घेण्याची धमक दाखवावी
By admin | Published: September 09, 2015 3:43 AM