नवी दिल्ली - इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain PM Boris Johnson) भारताच्याप्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहू शकतात. असे वृत्त आहे, की याप्रसंगी येण्यासाठी त्यांना भारताकडून निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच जॉन्सनदेखील भारतात येण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे ब्रिटनकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
यासंदर्भात, ब्रिटीश हाय कमिशनच्या प्रवक्त्यांनी न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना म्हटले आहे, की 'यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, ब्रिटिश पंतप्रधान लवकरात लवकर भारतात येण्यास उत्सुक आहेत.'
प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहिलेले शेवटचे ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर हे होते. ते 1993मध्ये प्रजासत्ताक दिनाला उपस्थित होते. मात्र, नवी दिल्लीने यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही. राजकीय तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान मोदींची ही अत्यंत विचार पूर्वक केलेली रणनिती आहे. त्यांचे म्हणणे आहे, की भारत आणि ज्यो बायडन यांच्या नेतृत्वातील अमेरिकेच्या संबंधांमुळे ब्रिटनचे पंतप्रधान अस्वस्थ होऊ नयेत, हा यामागील हेतू असू शकतो.
मोदींनी 27 नोव्हेंबरच्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, की त्यांनी पुढच्या दशकात भारत ब्रिटन संबंधांच्या महत्वाकांक्षी रोड मॅपवर बोरिस जॉन्सन यांच्याशी उत्कृष्ट चर्चा केली. तसेच आमची सर्वच क्षेत्रांत एका क्वांटम लीपसह - व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षितता, तसेच जलवायू परिवर्तनासंदर्भात सहमती झाली आहे.