ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - भारतीय बनावटीची आयएनएस कोची ही युद्धनौका मंगळवारी नौदलात दाखल झाली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत ही युद्धनौका राष्ट्राला समर्पित करण्यात आली असून आयएनएस कोचीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर पडली आहे.
आयएनएस दिल्ली क्लासनंतर आयएनएस कोलकाता वर्गातील दुसरी युद्धनौका अर्थात आयएनएस कोची ही अस्सल भारतीय बनावटीची युद्धनौका आहे. मुंबईतील नौदलाच्या माझगाव डॉक येथे या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. ही युद्धनौका शत्रूच्या रडारवर दिसत नसल्याने सागरी सुरक्षेत ही नौका महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. १६४ मीटर लांब व १७ मीटर रुंद असलेल्या या युद्धनौकेचे वजन ७५०० टन आहे. ३० अधिकारी व ३५० जवान या युद्धनौकेवर तैनात करता येऊ शकतात. या युद्धनौकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १६ ब्रह्मोस क्षेपणास्त्र युद्धनौकेवर तैनात आहेत. हे क्षेपणास्त्र २५० ते ३०० किलोमीटरच्या अंतरापर्यंत अचूकपणे लक्ष उध्वस्त करु शकतात. मंगळवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते आयएनएस कोची देशाला समर्पित करण्यात आली.