ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - 1971मधलं भारत-पाक युद्ध फारच भयंकर होतं. या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्याकाळी हे युद्ध लढलं गेलं होतं. त्याच आठवणींना भारत दौ-यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी उजाळा दिला आहे. 46 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एकत्रित 1971च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. या युद्धात मेजर अशोक तारा (निवृत्त) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. खरं तर मेजर तारांनीच युद्धात बांगलादेशातील पहिल्या परिवाराची पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटका केली होती. कदाचित त्यावेळी त्यांच्या गावीही नसेल की आपण बांगलादेशच्या भावी पंतप्रधानांचा जीव वाचवला आहे. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मेजर तारा यांची भेट झाली. भेटीनंतर 1971मधलं भारत-पाक युद्धाच्या आठवणींना हसीना यांनी उजाळा दिला. 1971मध्ये पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करल्यानंतर दुस-या दिवशी मेजर तारा यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशोक तारा यांना बंगबंधू शेख मुजिबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्याची मोहीम देण्यात आली. मुजिबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी लष्करानं धानमंडी भागातल्या एका घरात बंधक बनवलं होतं. बंधक बनवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मुजिबुर यांची पत्नी, 24 वर्षांची मुलगी शेख हसीना आणि त्यांच्या मुलाचा समावेश होता. या भाग ढाका एअरपोर्टपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. तीन सैनिकांसह मेजर तारा यांनी शेख हसीना यांच्या कुटुंबीयांना सुखरूप सोडवलं. या युद्धात भारतानं 3,843 जवान गमावले. 13 दिवस चाललेल्या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यानंतर तारा यांचं बांगलादेशाशी एक अलौकिक नातं निर्माण झालं.
भारतीय मेजरनं वाचवलं होतं बांगलादेशचं भविष्य
By admin | Published: April 09, 2017 11:56 AM