श्रीनगर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र देशात सध्या अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू असल्यानं धोका वाढला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे. मात्र देशात अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेदरम्यान धक्कादायक घटना घडल्या आहे. कुठे एकाचवेळी दोन डोस दिले जात आहेत, तर कुठे एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेले आहेत. काश्मीरमध्ये तर यापेक्षा जास्त धक्कादायक प्रकार घडला आहे.
काश्मीरमधील एका व्यक्तीनं केलेल्या दाव्यानं सध्या एकच खळबळ उडाली आहे. ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या आजोबांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याचा दावा ३३ वर्षांच्या मुदासीर सिद्दीक यांनी केला आहे. याबद्दलचा पुरावादेखील सिद्दीक यांनी दाखवला. सिद्दीक यांच्या आजोबांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याची नोंद कोविन ऍपवर आहे. सिद्दीक यांच्या आजोबांचं ६० वर्षांपूर्वीच झालं आहे.
आजोबांच्या नावाची नोंद कोविन ऍपवर असल्याचं पाहून मुदासीर सिद्दीक यांना धक्काच बसला. ६० वर्षांपूर्वी अल्लाघरी गेलेल्या आजोबांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचं पाहून मुदासीर चकित झाले. त्यानंतर त्यांनी याची माहिती माध्यमांना दिली. मुदासीर श्रीनगरचे रहिवासी असून त्यांचे आजोबा दादा अली मोहम्मद भट्ट यांच्या नावे कोविन ऍपवर एक प्रोफाईल आहे. विशेष म्हणजे आजोबांना मिळालेल्या लसींची नोंदणी मुदासीर यांच्याच मोबाईल क्रमांकावरून झाली आहे.
६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या आजोबांच्या नावाची नोंदणी आधार कार्डसह झाली असून त्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती मुदासीर यांनी दिली. विशेष म्हणजे ६० वर्षांपूर्वी देशात आधार कार्डच नव्हतं. हा संपूर्ण प्रकार तांत्रिक चुकीमुळे झाला असला असं गृहित धरलं तरी माझ्या आजोबांचं नाव कोविन ऍपला कसं माहीत?, असा सवाल त्यांनी केला. आमच्या कुटुंबातील कोणीही आजोबांच्या नावांची नोंद केलेला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.