ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन दर्ग्यामधील बेपत्ता उलेमा 20 मार्च रोजी भारतात परतणार असल्याचं वृत्त पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही उलेमा पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या ताब्यात आहेत. या दोघांचे मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटशी (एमक्यूएम) कथितरित्या संबंध असल्यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातील दोन उलेमा पाकिस्तानध्ये जाऊन बेपत्ता झाल्यानंतर भारताने शुक्रवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं होतं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विट करत भारताने पाकिस्तानसमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर पाऊल उलचण्याची विनंती केली होती.
I spoke to Mr. Sartaj Aziz Pakistan PM's Adviser on foreign affairs regarding missing Indian nationals /1 #Nizamuddin— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 18, 2017
Syed Asif Ali Nizami and Nazim Ali Nizami of Hazrat #Nizamuddin Aulia Dargah. He assured me of all help in tracing the missing clerics. /2— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 18, 2017
सईद आसिफ निजामी आणि त्यांचे पुतणे नाझिम निझामी १४ मार्च रोजी शाहिन एअरलाईन्सच्या विमानाने लाहोरहून कराचीला येणार होते. तथापि, लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना विमानातून उतरवून चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले, असे नाव गोपनिय ठेवण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले. या दोघांना अल्ताफ हुसैन यांच्या एमक्यूएमशी असलेल्या कथित संबंधांवरून ताब्यात घेण्यात आले. कराचीतील एमक्यूएम कार्यकर्त्यांशी असलेल्या संबंधांबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत त्यांच्याविरुद्ध काहीही निष्पन्न न झाल्यास त्यांची सुटका करण्यात येईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
एमक्यूएम सर्वात मोठा वांशिक पक्ष म्हणून १९८० मध्ये उदयास आला होता. त्याचे दक्षिण सिंधच्या शहरी भागात विशेष करून कराची, हैदराबाद, मिरपूरखास आणि सुक्कूर येथे प्रभुत्व आहे. १९४७च्या फाळणीदरम्यान भारतातून मोठ्या संख्येने पाकिस्तानात गेलेले उर्दु भाषिक लोक या भागांत स्थायिक झाले आहेत. ८० वर्षांचे आसिफ निजामी हजरत निझामुद्दीन दर्ग्याचे प्रमुख आहेत. कराचीतील बहिणीला भेटण्यासाठी ते आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी ८ मार्च रोजी पाकिस्तानला गेले होते. कराचीत नातेवाईकांकडे पाहुणचार घेतल्यानंतर ते १३ मार्च रोजी लाहोरला आले. तेथे सुफी संत बाबा फरिद यांच्या दर्ग्यात त्यांनी प्रार्थना केली. १४ मार्च रोजी ते कराचीला परतणार होते. मात्र, अचानक बेपत्ता झाले. बेपत्ता दोन भारतीय उलेमांचा सक्रीयपणे शोध घेण्यात येत आहे. आम्ही सर्व संबंधित विभागांना यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. तथापि, अद्याप दोन्ही उलेमांचा ठावठिकाणा लागलेला नाही, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी शुक्रवारी सांगितले होते. भारताने आपल्या बेपत्ता नागरिकांचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित करून त्यांचा शोध घेण्याचे आवाहन केले होते.