ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन दर्ग्यामधील बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले आहेत. पाकिस्तानत गेल्यावर मौलवी बेपत्ता झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. भारतात परतल्यानंतर दोन्ही मौलवींनी निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिली. यावेळी बोलताना नाझिम निझामी यांनी 'पाकिस्तानमधील उम्मत नावाच्या एका वृत्तपत्राने आम्ही रॉचे एजंट असल्याची खोटी बातमी छापली होती. बातमीसोबत आमचे फोटोही प्रसिद्ध केले होते', असं सांगितंल.
आसिफ निजामी आणि त्यांचा भाऊ नाझिम निजामी धार्मिक यात्रेसाठी पाकिस्तानला गेले होते. मात्र तेथून अचानक ते बेपत्ता झाले. इस्लामाबादमधील भारतीय राजदूताने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडे यासंबंधी तक्रारदेखील केली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मौलवींचं इसीसने अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती.
Delhi: The two Sufi clerics who had gone missing in Pakistan, have returned to India (visuals from Nizamuddin Dargah) pic.twitter.com/XJpATZXujA— ANI (@ANI_news) March 20, 2017
हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातील दोन उलेमा पाकिस्तानध्ये जाऊन बेपत्ता झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं होतं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विट करत भारताने पाकिस्तानसमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर पाऊल उलचण्याची विनंती केली होती.
There is a newspaper Ummat (in Pakistan) which has printed false statements (of the two clerics being RAW spies) and photos: Nazim Nizami pic.twitter.com/bFM87q5YOp— ANI (@ANI_news) March 20, 2017
सईद आसिफ निजामी आणि त्यांचे पुतणे नाझिम निझामी १४ मार्च रोजी शाहिन एअरलाईन्सच्या विमानाने लाहोरहून कराचीला येणार होते. तथापि, लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना विमानातून उतरवून चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते, असे नाव गोपनिय ठेवण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले. या दोघांना अल्ताफ हुसैन यांच्या एमक्यूएमशी असलेल्या कथित संबंधांवरून ताब्यात घेण्यात आले होते. कराचीतील एमक्यूएम कार्यकर्त्यांशी असलेल्या संबंधांबाबत त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्याविरुद्ध काहीही निष्पन्न न झाल्यास त्यांची सुटका करण्यात येईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले होते.
एमक्यूएम सर्वात मोठा वांशिक पक्ष म्हणून १९८० मध्ये उदयास आला होता. त्याचे दक्षिण सिंधच्या शहरी भागात विशेष करून कराची, हैदराबाद, मिरपूरखास आणि सुक्कूर येथे प्रभुत्व आहे. १९४७च्या फाळणीदरम्यान भारतातून मोठ्या संख्येने पाकिस्तानात गेलेले उर्दु भाषिक लोक या भागांत स्थायिक झाले आहेत. ८० वर्षांचे आसिफ निजामी हजरत निझामुद्दीन दर्ग्याचे प्रमुख आहेत. कराचीतील बहिणीला भेटण्यासाठी ते आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी ८ मार्च रोजी पाकिस्तानला गेले होते. कराचीत नातेवाईकांकडे पाहुणचार घेतल्यानंतर ते १३ मार्च रोजी लाहोरला आले. तेथे सुफी संत बाबा फरिद यांच्या दर्ग्यात त्यांनी प्रार्थना केली. १४ मार्च रोजी ते कराचीला परतणार होते. मात्र, अचानक बेपत्ता झाले होते.