नवी दिल्ली: भारताचं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्ताननं संताप व्यक्त केला. संयुक्त चौकशीची मागणी केली. संयुक्त राष्ट्रात धाव घेतली. नियमित देखभाल सुरू असताना क्षेपणास्त्र चुकून डागलं गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला. मात्र या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानात मोठा गोंधळ झाला आहे. कारण या घटनेनं पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
भारताचं क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानात १२४ किलोमीटर अंतरावर कोसळलं. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका गोदामाचं नुकसान झालं. या घटनेमुळे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन झाल्याचं पाकिस्ताननं म्हटलं. आम्ही क्षेपणास्त्र येत असताना पाहिलं. क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर आम्हीदेखील प्रत्युत्तराराखल क्षेपणास्त्र डागू शकलो असतो. पण आम्ही संयम बाळगला, असं पाकिस्ताननं सांगितलं.
भारतीय क्षेपणास्त्र आपल्या हद्दीत येत असल्याचं आम्ही पाहिलं होतं, असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. मग ते वेळीच हवेतच का नष्ट करण्यात का आलं नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोसळलेलं क्षेपणास्त्र ब्रह्मोस होतं की इतर कोणतं याचंही उत्तर पाकिस्तानकडे नाही.
पाकिस्तानी हवाई दल योग्य वेळी कारवाई करण्यात अपयशी ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. १९८१ पासून २००६ पर्यंत भारतीय हवाई दल सातत्यानं पाकिस्तानची हेरगिरी केली. त्यासाठी रशियन बनावटीचं मिग-२५ विमान वापरण्यात आलं. जगातील सर्वाधिक वेगवान लढाऊ विमान भारतानं हेरगिरीसाठी वापरलं. या मिशनची वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती, असं युरेशियन टाईम्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
पाकिस्तान सैन्य आणि सरकारला मिग-२५ च्या हालचालींची कल्पना होती. मात्र सुपरसॉनिक वेगानं उडणाऱ्या विमानाला रोखण्यात पाकिस्तान हवाई सैन्य अपयशी ठरतं हे नागरिकांना समजून देशाची इभ्रत जाऊ नये यासाठी हवाई दल आणि सरकारनं मौन बाळगणं पसंत केलं. मिग-२५ विमान पाकिस्तानच्या भूमीपासून ६५ हजार ८५ हजार फूट उंचावर होतं. जवळपास ३५०० किलोमीटर प्रति तास वेगानं मिग-२५ उडत होतं. पाकिस्तानकडे असलेलं सर्वोत्तम विमान एफ-१६ ५० हजार फूटांच्या वर उडू शकत नाही.
मे १९९७ मध्ये पाकिस्तानी जनतेला पहिल्यांदा याची माहिती मिळाली. मिग-२५ इस्लामाबादवरून जात असताना सोनिक बूम (बॉम्बस्फोटासारखा आवाज) ऐकू आला. तेव्हादेखील मिग-२५ हेरगिरीच करत होतं. पाकिस्तानच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या संरक्षण ठिकाणांचे फोटो मिग-२५ नं टिपले. त्याचवेळी अचानक ध्वनी नियंत्रण करणारी यंत्रणा फेल झाली आणि सोनिक बूम ऐकू आला. त्यामुळे लोक घाबरले. भारतीय विमानाला पिटाळून लावण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेत तयार करण्यात आलेली एफ-१६ विमानं पाठवली. मात्र पाकिस्तानच्या पदरी अपयश आलं.