नवी दिल्ली - भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत सुरक्षित आहे. देशाची संरक्षण संस्था सुरक्षित प्रक्रियेला आणि मानकांना सर्वोच्च प्राधान्य देते. नुकतेच भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची जी घटना घडली, ती चुकून घडली होती. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी राज्यसभेत माहिती दिली. तसेच, या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करत, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (Defense Minister Rajnath Singh)
सशस्त्र दल शिस्तबद्ध - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे. त्यामुळे, दुर्घटनेने मिसाईल फायर होण्याच्या घटनेच्या चौकशीत काही कमी आढळून आल्यास, ती दूर करण्यास भारत वचनबद्ध आहे. देशाची मिसाइल प्रणाली अत्यंत सुरक्षित आहे.'
पाकिस्तानात पडलं होतं भारताचं मिसाईल - भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला होता की, भारताच्या या क्षेपणास्त्राने सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे आम्हाला कळले होते आणि काही वेळातच त्याने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळाले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. तसेच, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत कोसळले.
संयुक्त चौकशीची मागणी -भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, क्षेपणास्त्र दुर्घटनेसंदर्भातील भारताच्या प्रतिसादावर आपण समाधानी नाही. क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याने, भारताची अंतर्गत तपासणी पुरेशी नाही, असे म्हटले होते. याच बरोबर या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी संयुक्त तपासाची मागणीही पाकिस्तानने केली होती, पण त्यांची ही मागणी भारताने धडकावली.