ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 20 - दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दीबापाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अब्दुल वाहिदला अटक करण्यात आली. अब्दुल वाहिदला दुबईवरुन भारतात पाठवण्यात आल्यानंतर विमानतळावर अटकेची कारवाई करण्यात आली. अब्दुल वाहिद सिद्दीबापा हा कर्नाटकच्या भटकळमधील रहिवासी आहे.
अब्दुल वाहिद इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख यासीन भटकळ जो सध्या तुरुंगात आहे याच्या घरापासून थोड्याच अंतरावर राहतो. अनेक प्रकरणांमध्ये अब्दुल वाहिद वॉण्टेड होता. अब्दुल वाहिद दुबईत राहत होता. त्याच्याकडे तरुणांना इंडियन मुजाहिद्दीनमध्ये भर्ती करण्याची जबाबदारी होती. तसंच फंडिंग करण्याच कामही करत होता.
अब्दुल वाहिदविरोधात अरेस्ट वॉरंट आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. ज्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल वाहिद जुलै 2006 मुंबई सिरियल ब्लास्ट, 2008मधील दिल्ली स्फोट आणि 2010 मध्ये बंगळुरुत झालेल्या चिन्नास्वामी स्टेडिअमवरील स्फोट प्रकरणी वॉण्टेड असल्याची माहिती इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसमध्ये दिली आहे. 2014मध्ये अब्दुल वाहिदचा माग काढण्यात आला होता मात्र त्याला अटक करु शकले नव्हते.