नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी गाजीपूरमधून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं आहे.इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना चालवण्यात तौकीरचा मोठा हात होता. रियाज भटकळसोबत मिळून इंडियन मुजाहिद्दीनसाठी तो काम करत होता. 2015 ते 17 दरम्यान सौदी अरेबियाला गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तौकीरचं नेपाळला वास्तव्य होतं, तौकीरनं नेपाळमध्ये बनावट दस्तावेज बनवले होते. सिमीला भारतात पुन्हा सक्रिय करण्यासाठी तो आला होता. मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील सिमीचं जाळं पुन्हा कार्यरत करण्यासाठी तो प्रयत्नशील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे. अब्दुल सुभान कुरेशी हा दहशतवादी 26 जानेवारी रोजी राजधानीत मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी 50 वाँटेड दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत इंडियन मुजाहिद्दीनचा हा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचंही नाव होतं.