नवी दिल्ली - प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी हा अखेर मंगळवारी मायदेशी परतला.हमीदला भारतात परत आणण्यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान, हमीद अन्सारी याने आज सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्याच्या भावनांचा बांध फुटला. सुषणा स्वराज यांना जवळ घेत हमीदने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. यावेळी हमीदच्या आईनेही सुषमा स्वराज यांचे आभार मानले. मेरा भारत महान असे त्या यावेळी म्हणाल्या. हमीद निहाल अन्सारीला भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी हमीदच्या कुटुंबीयांनी याआधीही सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांची भेट घेतल्याने जो आत्मविश्वास निर्माण झाला. त्यावरून आपला मुलगा देशात परत येईल, असे वाटू लागले. असे हमीदच्या आईने सांगितले.
दरम्यान, समाजमाध्यमाद्वारे प्रेम जुळलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात बेकायदेशीररित्या गेलेल्या हमीद निहाल अन्सारी या भारतीय तरुणाची मंगळवारी सहा वर्षांनी मुक्तता करण्यात आली. त्याला पाकिस्तानने मंगळवारी संध्याकाळी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले गेले. वाघा सीमेवर भारत व पाकिस्तानी लष्करामध्ये दररोज संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट हा सोहळा होतो. त्यावेळी दोन्ही बाजूला काही हजार प्रेक्षक तिथे जमा झालेले असतात. हा सोहळा संपल्यानंतर हमीद याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले.