नवी दिल्ली: पाकिस्तानच्या मध्यवर्ती तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकाची उद्या सुटका होणार आहे. हमीद अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात घुसखोरी करुन हेरगिरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर खटलादेखील चालवण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वीच पेशावर उच्च न्यायालयानं त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. हमीद यांची महिन्याभरात तुरुंगातून मुक्तता करा, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं. या पार्श्वभूमीवर उद्या हमीद यांची सुटका होणार असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हमीद अन्सारी सध्या पेशावरमधील मध्यवर्ती तुरुंगात आहेत. मूळचे मुंबईचे रहिवासी असलेल्या हमीद अन्सारी यांना नोव्हेंबर 2012 मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. अवैध कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानात घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र शिक्षा पूर्ण केल्यानंतरही पाकिस्तान सरकारनं अन्सारी यांची सुटका केली नाही. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी पेशावर उच्च न्यायालयाच धाव घेतली. न्यायालयानं अन्सारी यांच्या बाजूनं निकाल दिल्यानं आता त्यांची घरवापसी होणार आहे. 2012 मध्ये अन्सारी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री झाली होती. तिला भेटण्यासाठी ते अवैधपणे पाकिस्तानला गेले. अफगाणिस्तान मार्गे ते पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. त्यानंतर कोहट जिल्ह्यात त्यांना पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. हमीद अन्सारी यांनी 'हमजा' नावानं खोटी कागदपत्रं तयार करुन पाकिस्तानात घुसखोरी केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. पाकिस्तानी विरोधी कारवाया केल्याचा, हेरगिरी केल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र अन्सारी यांनी हे आरोप न्यायालयात फेटाळून लावले होते.
पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय नागरिकाची उद्या होणार सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 3:31 PM