- निनाद देशमुख - पुणे : विमानांविषयी लहानपणापासूनच आकर्षण होते. विमानांचा आवाज ऐकला की मी घरातून पळत बाहेर येत असे. विमानांचे हे आकर्षण मी ध्येयामध्ये बदलले आणि वैमानिक होण्याचे ठरविले. घरी लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. मी, जिद्दीने अभ्यास केला. सुरुवातीला यश आले नाही. त्यामुळे मी एमटेकमध्ये प्रवेश घेतला. मात्र, संरक्षण दलाविषयीचे आकर्षण कायम असल्याने मी माझा अभ्यास कायम ठेवला. याच प्रयत्नांमुळे मला यश आले आणि मी नौदलातील पहिली महिला वैमानिक होऊ शकले, अशी भावना नौदलातील वैमानिक सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शिवांगी या नौदलाचे डॉर्निअर विमान उडवून भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणार आहेत. बुधवारी देशभरात नौदल दिवस साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांआधीच कोची येथील नौदलाच्या तळावर झालेल्या एका कार्यक्रमात शिवांगी नौदलात दाखल झाल्या. नौदलाच्या दक्षिण विभागाचे फ्लॅग आॅफिसर कमांडिग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल ए. के. चावला यांच्या हस्ते सब लेफ्टनंट शिवांगी यांना नौदलातील विंग प्रदान करण्यात आले. शिवांगी या मूळच्या बिहारमधील मुझफ्फरपूर येथील आहेत. त्यांच्या शाळेजवळ त्यांनी एकदा हेलिकॉप्टर उतरताना पाहिले. तेव्हापासून त्यांना वैमानिक बनावे असे वाटत होते. महाविद्यालयीन जीवनात आल्यावर शिवांगी यांनी वैमानिक बनण्याचे ठरवले. शिवांगीच्या निर्णयाला त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला आणि त्यांना लागणारी सर्व मदत त्यांना दिली. शिवांगीने जिद्दीने अभ्यास करत एसएसबीची परीक्षा दिली. महाविद्यालयात असताना नौदलात जाण्यासाठी त्यांनी यूईएस परीक्षा दिली. याच दरम्यान नौदलात जाण्याचे शिवांगीने मनाशी पक्के ठरविले आणि परीक्षा दिली. मात्र, एसएसबी(सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड)ची परीक्षा आणि मुलाखत कठीण असते. या परीक्षेची प्रक्रिया मोठी असते. परीक्षा दिल्यावर मेरीट लिस्ट यायला तब्बल ६ महिने बाकी होते. याच वेळी शिवांगीने गेट परीक्षेतही चांगले गुण मिळवल्याने तिने दरम्यानच्या काळात एम.टेक. करण्याचे ठरवले. जयपूर येथील एनआयटीमध्ये तिने एमटेकसाठी प्रवेश घेतला. मात्र, तिचे लक्ष एसएसबीच्या निकालाकडे होते. एसएसबीचा निकाल आला आणि तिची निवड नौदलातील वैमानिकासाठी झाली. त्यांनी २७ एनओसी कोर्सच्या माध्यमातून एसएससी(पायलट) परीक्षा उत्तीर्ण करून नौदलातील वैमानिक पदासाठी त्या पात्र झाल्या. गेल्या जून महिन्यात त्या नौदलात दाखल झाल्या. सध्या शिवांगी नौदलातील डॉर्निअर हे टेहळणी विमान उडविणार आहेत. त्यांचे पुढील प्रशिक्षण झाल्यावर त्या मोठी विमाने उडविण्यास पात्र ठरणार आहेत.
संरक्षण दलात महिलांना मोठ्या संधी... संरक्षण दलाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलात महिलांना मोठ्या संधी आहेत. या संधींचे सोने महिलांनी करावे. आज महिला पुरुषांशी प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करत आहेत. संरक्षण दलातही महिला आज स्वत:ला सिद्ध करत आहेत.
................संरक्षण दलाबद्दल मला पूर्वीपासूनच आकर्षण आहे. त्यामुळेच मी या क्षेत्रात येण्याचे ठरविले. संरक्षण दले म्हणजे केवळ नोकरी नसून त्याहीपेक्षा जास्त आहे. यात शिस्तीबरोबरच जीवन जगण्याची शैली ही सामान्य जीवनापेक्षाही जास्त आहे. अभ्यास करताना मी कधीही स्वत:ला डिप्रेस होऊ दिले नाही. त्यामुळेच मी आज हे यश मिळवू शकले आहे.- शिवांगी स्वरूप, सब लेफ्टनंट, भारतीय नौदल
..............डॉर्निअर विमानांद्वारे ठेवणार समुद्री सीमांवर नजर...समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नौदलातर्फे डॉर्निअर या विमानांचा वापर केला जातो. शिवांगी यांनी हे विमान उडविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, या विमानातून शिवांगी या भारतीय समुद्री सीमांवर लक्ष ठेवणार आहेत.