नवी दिल्ली : महिनाभर चीनसह जवळपास 48 देशांमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर आज भारतात 11 जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये 230 बेड 25 हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून महाराष्ट्रातही काही संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुढील काळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून नौदलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
भारतीय नौदल 18 मार्चला जवळपास 40 देशांसोबत सर्वात मोठा युद्धसराव करणार होते. याला मिलन असे नाव दिले गेले होते. विशाखापट्टणमच्या समुद्रात हा सराव होणार होता. मात्र, भारतात पुढील काही दिवसांत रुग्णांची संख्या 2500 च्या वर जाण्याची शक्यता असल्याने हा युद्धसराव रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने लष्कर, हवाई दलालाही मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यातच आता आग्र्यात देखील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झालं असल्याची सॅम्पल टेस्टमध्ये आढळून आले आहे. दिल्लीमधील कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असल्यामुळे या सहाही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच राजस्थानमध्येही काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत कोरोनाचे रुग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रुग्णालयातच ठेवावे, अशा सूचना आहेत.