नवी दिल्ली - देशभरात गांधी जयंती (2 ऑक्टोबर) पासून एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर (सिंगल यूज प्लास्टिक) बंदी लागू झाली आहे. त्यात थर्माकोलच्या वस्तू, तसेच प्लास्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी धोकादायक आहे, तरीही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर, सरकारकडून प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसी) ने सिंगल यूज प्लास्टिकच्या मदतीने 850 मीटरचा रस्ता तयार केला आहे.
हरयाणा राज्यातील फरीदाबादमध्ये आयओसीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटीच्या बाहेर प्लास्टिकपासून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. 850 मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी 3 टक्के प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्यात आला आहे. रस्ता तयार करताना पैशांची बचत होणार असल्याची माहिती आयओसीचे संचालक एस. एस. व्ही. रामकुमार यांनी दिली आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे दोन वर्षांसाठी मेंटेनन्स केले जाणार आहे. कंपनीच्या प्रयोगशाळेत हा प्रयोग लोड कपॅसिटी आणि डेप्रिसिएशन रेझिस्टन्सच्या चाचणीत यशस्वी झाला असल्याची माहिती देखील रामकुमार यांनी दिली आहे.
रामकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर या संदर्भात एक नवे धोरण तयार करावे अशी विनंती एमओआरटीएचकडे (मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज) करण्यात येणार आहे. सरकारी निर्णयानुसार बुधवारपासून एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नव्या नियमानुसार दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशवीवर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव असणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टिक, थर्माकोलवर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाड व दोन ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे सीलबंद प्लास्टिक पॅकेजिंग/आवरण असल्यास, त्यावर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव प्रसिद्ध करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. प्लास्टिक व थर्माकोलबंदी अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाल्यास 5 हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यास 10 हजार रुपये तर तिसऱ्यांदा गुन्हा नोंद झाल्यास 25 हजार रुपये आणि 3 महिने कारावास अशी दंडात्मक कारवाई केली जाईल.