नवी दिल्ली : इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने (आयओसी) भाड्याने घेतलेल्या एका तेलवाहू जहाजाला श्रीलंकेच्या पूर्व भागातील समुद्रामध्ये गुरुवारी आग लागली. या जहाजातील खलाशांना वाचविण्यासाठी व आग विझविण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलाने दोन नौका, तसेच एका विमानाच्या मदतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.या जहाजावर नेमके किती खलाशी आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आयओसीने भाड्याने घेतलेले न्यू डायमंड हे जहाज ओदिशातील पारादीप या बंदराकडे रवाना होत असताना, वाटेत त्याला आग लागली. इंडियन आॅईल कॉपोर्रेशनचा पारादीप येथे तेलप्रकल्प असून, तिथे दररोज तीन लाख पिंपे तेलाचे शुद्धीकरण केले जाते. न्यू डायमंड हे जहाज कुवेतमधील मीना अल अहमदी बंदरातून तेलसाठा घेऊन निघाले होते. न्यू डायमंड हे खूप मोठ्या आकाराचे तेलवाहू जहाज आहे. श्रीलंकेच्या पूर्व भागातील किनाऱ्यापासून २० सागरी मैल अंतरावर या जहाजाला आग लागण्याची घटना घडली आहे, असे श्रीलंकेचे प्रवक्ते कमांडर रणजित राजपक्ष यांनी सांगितले.न्यू डायमंड जहाजातून तेल गळती होऊ नये यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अशी तेल गळती झाल्यास सागरी जैव साखळीला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन श्रीलंकेने पावले उचलण्याचे ठरविले आहे. या जहाजामध्ये २ लाख ७० हजार टन तेलसाठा आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचाही सहकार्याचा हातरिलायन्स इंडस्ट्रीजने भाड्याने घेतलेले हेलन एम हे जहाजही न्यू डायमंड या तेलवाहू जहाजाला लागलेली आग विझविण्याच्या कामात सहभागी असल्याचे कळते. भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता न्यू डायमंड जहाजाला आग लागल्याचे सांगण्यात आले.
इंडियन ऑईलच्या तेलवाहू जहाजाला भीषण आग, २ लाख हजार टन साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:47 AM