Sam Pitroda News : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. पित्रोदा यांनी देशातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना चायनीज, आफ्रीकन, अरब म्हटल्यामुळे मोठा वाद झाला. भाजपनेही हा मुद्दा जोरदार लावून धरला. आता अखेर वाढता वाद पाहता पित्रोदांनी काँग्रेस अध्यक्षांना आपला राजीनामा दिला.
पित्रोदांची वादग्रस्त वक्तव्येगेल्या काही दिवसांपासून सॅम पित्रोदा चर्चेत आले आहेत. आधी त्यांनी संपत्तीच्या वाटणीबाबत केलेल्या वक्तव्याने वाद पेटला होता, त्यानंतर आता त्यांनी देशातील नागरिकांच्या रंग आणि दिसण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्यांनी भारताच्या दक्षिण-उत्तर आणि पूर्ण-पश्चिम भागात राहणाऱ्या लोकांची चायनीज, आफ्रीकन, गोऱ्या आणि अरब लोकांशी तुलना केली.
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
दरम्यान, पित्रोदांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसने स्वतःला त्यापासून देर ठेवले. जयराम रमेश यांनी सकाळीच एक्स पोस्टमध्ये सांगितले की, "सॅम पित्रोदा यांनी भारतातील विविधतेला दिलेली उपमा अत्यंत चुकीची आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वतःला या वक्तव्यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवते," असे जयराम रमेश यांनी म्हटले होते.
नरेंद्र मोदींची टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगाणामधील वारंगल येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी आज खूप संतप्त झालो आहे. काँग्रेस युवराजांच्या एका काकांनी आज अशी शिवी दिली, ज्यामुळे मला खूप राग आलाय. राज्यघटनेला डोक्यावर घेणारी मंडळी देशातील लोकांच्या रंगाचा अपमान करत आहे. ज्या लोकांचा रंग काळा असतो, ते काय सगळे आफ्रिकेतले आहेत? माझ्या देशातील लोकांना त्यांच्या त्वचेच्या रंगावरून यांनी शिवीगाळ केली गेली. त्वचेचा रंग कुठलाही असो आम्ही श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. काँग्रेसच्या युवराजांना याचे उत्तर द्यावे लागेल. त्वचेच्या रंगाच्या आधारावर माझ्या देशवासीयांचा झालेला अपमान देश सहन करणार नाही आणि मोदी तर अजिबात सहन करणार नाही, असं मोदी म्हणाले.