Prashant Kishore Congress : २०२४ चा प्लॅन तयार; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसकडून ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 04:03 PM2022-04-16T16:03:07+5:302022-04-16T16:03:40+5:30
Prashant Kishore Congress : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला २०२४ च्या निवडणुकीचे तपशीलवार सादरीकरण दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Prashant Kishore Congress : २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनकच राहीली आहे. दरम्यान, आता काँग्रेसनं २०२४ च्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना मोठी ऑफर दिली आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात सामील होण्यास तसंच सल्लागार म्हणून काम करण्यास काँग्रेसनं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
प्रशांत किशोर यांनीदेखील यात स्वारस्य दाखवलं असून पक्षाच्या कमकुवत बाजूंवर तपशीलवार सादरीकरणही केलं. तसंच सुधारणांसाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याची माहितीही त्यांनी दिल्याचं सूत्रांनी म्हटलं. एनडीटीव्ही इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. किशोर यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी तपशीलवार सादरीकरणदेखील केलं आहे, याशिवाय त्यांच्या सूचना आणि कल्पनांवर अभ्यास करण्यासाठी आणि ते पुढे कशा राबवाव्या यासाठी एक छोटी समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी दिली.
दरम्यान, ही बैठक या वर्षाच्या अखेरिस असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी नसल्याची माहिती प्रशांत किशोर यांच्या नजीकच्या सूत्रांनी दिली. काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर मुख्यत्वे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांवर चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२४ बाबात एका निश्चित निर्णयावर पोहोचल्यानंतर गुजरात किंवा अन्य राज्यांमध्ये निवडणुका प्रशांत किशोर यांची नियुक्ती आणि जबाबदारीच्या अनुषंगानं होतील, असंही सूत्रांनी सांगितलं.
शनिवारी काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, एके अँटनी, अंबिका सोनी, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह आणि अजय माकन हेदेखील पोहोचले होते.