मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:32 IST2025-02-18T15:31:25+5:302025-02-18T15:32:27+5:30
Rahul Gandhi: राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...'
CEC selection: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. तसचे, निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्य आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली. त्यांनी 'एक्स' वर एका पोस्टद्वारे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आणि अशी पावले भारतीय लोकशाहीची ताकद कमकुवत करू शकतात, असेही म्हटले.
राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित समितीच्या बैठकीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना एक नोट दिली होती. यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, विशेषत: निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असली पाहिजे.
During the meeting of the committee to select the next Election Commissioner, I presented a dissent note to the PM and HM, that stated: The most fundamental aspect of an independent Election Commission free from executive interference is the process of choosing the Election… pic.twitter.com/JeL9WSfq3X
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 18, 2025
मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सरन्यायाधीशांना या निवड समितीतून काढून टाकल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत मतदारांच्या मनात चिंता वाढली आहे. हे सरकारचे जबाबदारीपासून पळ काढणारे आणि लोकशाही संस्थांच्या आदराचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.
बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या देशाचे संस्थापक नेते यांच्या आदर्शांचे पालन करून सरकारला जबाबदार धरणे हे विरोधी पक्षनेते (LoP) या नात्याने आपले कर्तव्य आहे, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, 48 तासांत त्यावर सुनावणी होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत निर्णय घेणे अयोग्य असल्याची टीकाही त्यांनी केली.