Indian Post: भारतीय टपाल विभागाने(Indian Post) पहिल्यांदाच एका ड्रोनद्वारे पत्र पोहचवले आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट अंतर्गत याचे यशस्वी परीक्षण करणयात आले. पत्र पोहोचवण्यासाठी वापरलेले ड्रोन गुरुग्राममधील स्टार्टअप कंपनी 'टेकईगल'ने बनवले आहे. पत्र पाठवण्यासाठी ड्रोनचा पहिल्यांदाच वापर झाला आहे. ड्रोनने फक्त अर्ध्या तासात 46 किलोमीटरचे अंतर कापत पत्र पोहचवले.
TechEagle ने गेल्या महिन्यात देशातील सर्वात वेगवान हायब्रिड इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (VTOL) सेवा 'Vertiplane X3' सुरू केली होती. या ड्रोनची रेंज 100 किमी आणि वेग ताशी 120 किमी असून, 3 किलो वजनाचे पार्सल नेण्यास सक्षम आहे. हे ड्रोन पाच बाय पाच मीटर परिसरात हेलिकॉप्टरप्रमाणे टेक ऑफ करू शकते. कंपनीने नुकत्याच झालेल्या ड्रोन फेस्टिव्हलमध्ये व्हर्टीप्लेन X3 देखील प्रदर्शित केले होते.
ड्रोन डिलिव्हरीच्या तांत्रिक व्यवहार्यतेची चाचणी करणे हा या पायलट प्रोजेक्टचा उद्देश होता, असे कंपनीने म्हटले आहे. या पायलट प्रोजेक्टच्या यशामुळे भविष्यात ड्रोनद्वारे मेल पोहोचवणे शक्य होणार आहे. TechEagle चे संस्थापक आणि CEO विक्रम सिंह मीना यांनी सांगितले की, 27 मे रोजी भुज तालुक्यातील हबे गावातून कंपनीच्या 'व्हर्टीप्लेन X3' ने भारतीय टपाल विभागाचा मेल कच्छ जिल्ह्यातील भाचानु तालुक्यातील नेर गावात नेला. ही सर्वात लांब ड्रोन डिलिव्हरी असल्याचे त्यांनी सांगितले.