नवी दिल्ली - कोरोनाकाळात लॉकडाऊनदरम्यान बंद झालेली रेल्वेसेवा (Indian Railway)आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, भारतीय रेल्वे आपल्या व्यवस्थेत काही बदल करण्याच्या तयारीत असून, त्याचा एका भाग म्हणून प्रवासादरम्यान झोपून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत आता रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (10% higher fare to be charged from sleeping passengers? The Ministry of Railways says ...)
व्हायरल होत असलेल्या वृत्तामध्ये जे प्रवासी प्रवासादरम्यान झोपून प्रवास करू इच्छित असतील त्यांच्याकडून रेल्वे १० टक्के अधिक भाडे वसूल करू शकते, असे म्हटले होते. मात्र रेल्वेने आता याबाबत स्पष्टीकरण देताना अशा प्रकारचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पीआयबीने याचे फॅक्ट चेक करत या दाव्याबाबतची सत्यता समोर आणली आहे.
पीआयबीने याबाबत माहिती देताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही मीडिया रिपोर्टसमध्ये झोपून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १० टक्के अधिक भाडे वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र दावा पूर्णपणे खोटा आहे. हा केवळ रेल्वे बोर्डाला दिलेला एक सल्ला होता. रेल्वे मंत्रालयाने याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही.
ज्या वृत्ताबाबत पीआयबीने फॅक्टचेक केले आहे. त्यामध्ये बेडरोलचे भाडे वाढवण्याचाही उल्लेख केला गेला आहे. बेडरोलचे भाडे ६० रुपये करण्यात येणार असून, त्यामधून रेल्वेला कोट्यवधीचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा दावा केला गेला होता. सध्या प्रवाशांकडून बेडरोलचे कमाल भाडे २५ रुपये एवढेच घेतले जाते.