नवी दिल्ली - भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात. 2013पासून ते 2018पर्यंत एकूण 350 अपघातांमध्ये 419 प्रवाशांच्या नाहक बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे अपघातांबाबतची माहिती पुरवण्याची मागणी आरटीआयमार्फत केली होती. रेल्वे बोर्ड विभागात 2013 पासून ते 2018 पर्यंत एकूण किती रेल्वे अपघात झाले?, अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले? अपघातांमुळे रेल्वेला किती प्रमाणात नुकसान झाला?, ही माहिती शेख यांनी विचारली होती. यानंतर रेल्वे बोर्डाचे जनमाहिती अधिकारी तथा उप निदेशक/संरक्षा संजोय अब्राहम यांनी शकील अहमद शेख यांना सर्व माहिती उपलब्ध करुन दिली.
मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आरटीआयनुसार, एप्रिल 2013 पासून मार्च 2018 पर्यंत एकूण 350 रेल्वे अपघात झाले. यामध्ये 419 प्रवाशांचा बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे रेल्वेला तब्बल 282 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातांमध्ये लोकल रूळावर घसरणे, उलटणे तसंच आग लागणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे.
2013-2014 एकूण 64 रेल्वे अपघात, 41 प्रवाशांचा मृत्यू, 79 प्रवासी जखमी, 38 कोटी 2 लाख रुपयांचे नुकसान
2014-2015 एकूण 74 रेल्वे अपघात, 119 प्रवाशांचा मृत्यू, 322 प्रवासी जखमी, 72 कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान
2015-2016 एकूण 68 रेल्वे अपघात, 36 प्रवाशांचा मृत्यू, 101 प्रवासी जखमी, 59 कोटी 24 लाख रुपयांचे नुकसान
2016-2017एकूण 84 रेल्वे अपघात, 195 प्रवाशांचा मृत्यू, 346 प्रवासी जखमी, 62 कोटी 29 लाख रुपयांचे नुकसान
2017-2018 एकूण 60 रेल्वे अपघात, 28 प्रवाशांचा मृत्यू, 176 प्रवासी जखमी, 51 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान
90 टक्के अपघात गाड्या रूळावर घसरल्याने झाले आहेत. तसेच 6 टक्के अपघात गाड्यांची टक्कर, तर 4 टक्के अपघात आग लागण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून शुल्क आकारत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी उपाय का केले जात नाहीत, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे.