नवी दिल्ली - भारतीय रेल्वे हे देशांतर्गत प्रवासाचे मोठे माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. मात्र आता रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले. अश्विनी वैष्णव यांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांची भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू करण्यात येतील का, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सध्याच्या काळात ५५ टक्के सवलत दिली जात आहे.
त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळामध्ये एका प्रवाशाच्या भाड्यावर रेल्वेचा प्रतिकिमी खर्च सुमारे १.१६ रुपये होतो. मात्र रेल्वे त्यासाठी केवळ ४५ ते ४८ पैसे प्रतिकिमी एवढेच भाडे आकारते. गेल्या वर्षाची आकडेवारी सांगताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवासी भाड्यावर रेल्वेकडून सुमारे ५९ हजार कोटी रुपये एवढी सब्सिडी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. नव्या ट्रेनचे संचालन आणि रेल्वेमार्गांचा विस्तार केला जात आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांसाठी अनेक नव्या प्रकारच्या सुविधा आणल्या जात आहेत. ट्रेनच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात अजूनही निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रेल्वेबाबत एक व्यापक दृष्टीकोन असून, मोठ्या रेल्वेस्टेशनसोबतच छोट्या रेल्वेस्टेशनचाही विकास करण्यात येणार आहे.
यापूर्वी अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील एम्सवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बहुआयामी स्तरावर काम सुरू आहे. त्याशिवाय इतरही काही पावले उचलण्यात येणार आहेत.