बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी व शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री ७ वाजून वीस मिनिटांनी समाेरासमाेर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०७ जण मरण पावले असून, ९०० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना बालासोरसहित विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसंच अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पाच डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पाच बचाव पथके अपघातस्थळी पाठवली. सुरूवातीला या अपघातातील मृतांची संख्या ५० आणि नंतर ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु रात्री ही संख्या वाढून १२० वर पोहोचली आणि जखमींची संख्या ३५० झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु अद्यापही बचावकार्य सुरु असून यातील मृतांचा आकडा वाढला आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी वृत्ताला दुजोरा देत यात २०७ जणांचा मृत्यू तर ९०० प्रवासी जखमी झाल्याचं म्हटलं.
रुग्णवाहिकाही पडू लागल्या अपुऱ्या जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बालासोरसह अन्य ठिकाणांहून ५० रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. मात्र जखमींची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिकाही अपुऱ्या पडू लागल्या.
मदतीची घोषणा : दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख तर किरकोळ जखमींना ५० हजाराची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
वंदे भारत लोकार्पण रद्द : बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर शुक्रवारी (दि. ३ जून) होणारा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा गोवा राज्यातील मडगाव येथे होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान, राष्ट्रपतींना तीव्र दु:खकोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडीच्या भीषण अपघातात झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहेत.