नवी दिल्ली - भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी नियमितपणे प्रयत्न करत असते. दरम्यान, तुम्हीही रेल्वेने नियमित प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांना त्यांना प्रवासासाठी लोअर बर्थ मिळावी, असे वाटत असते. त्यांना अनेकदा लोअर बर्थ मिळते, कधी कधी ती मिळत नाही. कधी लोअर बर्थ मिळालीच तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जर तुम्हाला लोअर बर्थ म्हणजे खालच्या बाकावरून प्रवास करायचा असेल तर आयआरसीटीसीने त्यासाठी एक मोठी अपडेट दिली आहे.
भारतीय रेल्वेकडून ट्रेनमध्ये प्रवास करताना सीनियर सिटिझन्सना लोअर बर्थसाठी प्राधान्य दिलं जातं. मात्र अनेकदा तिकीट बुकिंगदरम्यान सीनियर सिटिझन्ससाठी आग्रह करूनही लोअर बर्थ मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रवासात अडचणी येतात. मात्र आता त्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. इंडियन रेल्वेने त्यांना कशाप्रकारे कन्फर्म लोअर बर्थ मिळेल हे सांगितले आहे.
एका प्रवाशाने सिनियर सिटिझन्सना बुकिंगदरम्यान लोअर बर्थ मिळत नाही, अशी तक्रार एका प्रवाशाने ट्वीट करून रेल्वेकडे केली होती. या प्रवाशाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करून लिहिले की, बर्थ देण्यामागे नेमकं काय धोरण आहे. मी तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ प्रेफरन्ससह तिकीट बूक केले होते. त्यावेळी १०२ सिट उपलब्ध होत्या. तरीही मला मिडल बर्थ, अप्पर बर्थ आणि साइड लोअर बर्थ दिली गेली. यात सुधारणा झाली पाहिजे.
त्यानंतर आयआरसीटीसीने ट्विटरवर या प्रश्नाबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात उत्तरदाखल लिहिलं की, महोदय लोअर बर्थ, सिनियर सिटिझन कोटा केवळ ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयासाठी आहे. ४५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या महिलेसाठी निर्धारित खालील बर्थ आहे. जेव्हा ते एकटे किंवा दोन प्रवासी प्रवास करतात. तसेच जेव्हा दोन पेक्षा जास्त सीनियर सिटीझन किंवा एक सिनियर सिटिझन आहे आणि दुसरा नसेल तर सिस्टिम त्यावर विचार करणार नाही.