गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका बऱ्यापैकी वाढला आहे. या काळात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवणं ही सामान्य बाब आहे. मात्र थंडीचा कडाका वाढल्याने भरधाव ट्रेनमध्ये काही जणांनी शेकोटी पेटवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ट्रेनमधे शेकोटी पेटवल्या प्रकरणी फरिदाबादमधील चंदन कुमार आणि देवेंद्र सिंह यांना अटक करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये शेकोटी पेटवल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली होती, असे चौकशीमध्ये मान्य केले.
दोन्ही आरोपींसोबत इतर काहीजणी थंडीपासून बचावासाठी हात शेकवत होते. आरपीएफला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये चंदन आणि देवेंद्र हे शेकोटी पेटवण्यासाठी गोवऱ्या सोबत आणल्या होत्या, अशी माहिती समोर आली. पुढे अलीगड येथे या दोघांनाही अटक करण्यात आली. कुठलाही ज्वालाग्राही पदार्थ घेऊन ट्रेनमधून प्रवास करता येत नाही, असा नियम आहे. त्यानुसारच या आरोपींना अटक झाली आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार काही पदार्थ रेल्वेमधून नेण्यास मनाई आहे. यामध्ये स्टोव्ह, गॅस सिलेंडर, कुठलेही ज्वालाग्राही रसायन, फटाके, अॅसिड, चामडे, दुर्गंधीयुक्त वस्तू, ग्रीस, तूप यांचा समावेश आहे. अशा वस्तू घेऊन प्रवास करताना आढळल्यास रेल्वे कायदा कलम १६४ अन्वये कारवाई होऊ शकते. यामध्ये एक हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.