नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण रेल्वेमधून प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळालं नाही तर ते जेवण मोफत असणार आहे. मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचे तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्व प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने लावले जाणार आहेत. विशेष म्हणजे या तक्त्यावर ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण मोफत असणार आहे’ असा महत्त्वाचा संदेश लिहिलेला असणार आहे. रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी पियूष गोयल यांनी प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे एकच हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचा आदेश दिला. तसेच देशभरातील 723 रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा मिळत आहे. हा आकडा वाढवून 2000 रेल्वे स्थानकांत मोफत वाय-फायची व्यवस्था करण्यात येईल असंही पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
पियुष गोयल यांनी 31 मार्च 2019 पर्यंत सर्व ट्रेनमधील कॅटरिंग स्टाफ आणि टीटीई यांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वितरीत करण्याचा सल्ला दिला आहे. या मशीनमध्ये स्वाइप करण्याची तसेच बिल जनरेट करण्याची सुविधा असेल. यामुळे जेवणासाठी जास्त किंमत आकारणाऱ्या कॅटररविरोधात होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासही मदत मिळणार आहे. तसेच ज्या ट्रेनमध्ये कॅटरिंग सुविधा आहे त्यांना जेवणाच्या किंमती दर्शवणारे तक्ते मार्च 2019 पर्यंत तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.