नवी दिल्ली - लांबच्या प्रवासाला निघण्याचं नियोजन करताना रेल्वेचं तिकीट बुकिंग करणं ही बऱ्याचदा कटकटीची प्रक्रिया ठरते. मात्र आता ट्रेनमध्ये रिझर्व्हेशन करणं आणखी सोप्पं झालं आहे. त्यासाठी आयआरसीटीच्या साईटमध्ये किंवा अन्य कुठल्याही अॅपमध्ये लॉगइन करण्याची गरज भासणार नाही. रिझर्व्हेशन करणं सोपं व्हावं, यासाठी आयआरसीटीसी चॅटबोटच्या माध्यमातून तिकीट बुक करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. ही सुविधा हल्लीच सुरू करण्यात आली आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार चॅटबोटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोक रिझर्व्हेशन करत आहेत.
आयआरसीचीच्या वेबसाईटवरून दररोज दहा लाखांहून अधिक तिकिटांचे बुकिंग होते. त्याशिवाय प्रवासी स्टेशनवर जाऊन आणि इतर अॅपच्या माध्यमातूनही तिकीट बुक करतात. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आयआरसीटीसीने चॅटबोटच्या माध्यमातून रिझर्व्हेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामाध्यमातून सहजपणे रिझर्व्हेशन केले जाऊ शकते. त्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगइन करण्याची आवश्यकता भासत नाही. या चॅटबोटला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे आयआरसीटीसीने सांगितले.
या सुविधेसाठी आयआरसीटीच्या वेबसाईटच्या एवढाच सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. स्लीपर क्लाससाठी १० रुपये आणि एसी क्लाससाठी १५ रुपये. तसेच यूपीआयवरून पेमेंट केल्यास स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी ३० रुपये कुठल्याही पेमेंट मोडवरून भरणा केल्यावर द्यावे लागतील.