भारतातील प्रवासी वाहतुकीचं सर्वात मोठं माध्यम हे रेल्वे आहे. देशभरात दररोज हजारो रेल्वेगाड्यांमधून लाखो प्रवासी ये जा करत असतात. अशा परिस्थितीत या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर असते. त्यांची एखादी चूक हजारो प्रवाशांचे प्राण संकटात आणू शकते. असाच धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा येथील उदी मोर स्टेशनवरील स्टेशन मास्तरला ऑन ड्युटी असताना डुलकी लागली. त्यामुळे सिग्नलची वाट पाहत पाटणा-कोटा एक्स्प्रेस स्टेशनवरच खोळंबून राहिली. या ट्रेनचा ड्रायव्हर सिग्नलची वाट पाहत जवळपास अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला.
इटावामधील उदी मोर रेल्वे स्टेशन हे आग्रा विभागामध्ये येते. उदी मोर हे छोटं पण महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहेय इथून आग्र्यासोबत झाशी येथून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही येथून जातात. या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, स्टेशन मास्तरला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. स्टेशन मास्तरांच्या बेफिकीरीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत अधिक माहिती देताना आग्रा रेल्वे विभागाचे पीआरओ प्रशस्ती श्रीवास्तव यांनी न्यूज एजन्सीला सांगितले की, आम्ही स्टेशन मास्तरांना आरोप पत्र बजावलं आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोपी गेलेल्या स्टेशन मास्तराला जागवण्यासाठी ट्रेनच्या लोको पायलटने वारंवार हॉर्न वाजवून पाहिला. मात्र त्याला सुरुवातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, स्टेशन मास्तरांनी आपली चूक कबूल केली असून, त्यासाठी माफी मागितली आहे. आपण स्टेशनवर एकटेच होतो. तसेच सोबत असलेला कर्मचारी ट्रॅक निरीक्षणासाठी गेला होता, असे या स्टेशन मास्तकांनी सांगितले.
दरम्यान, विभागीय रेल्वे व्यवस्थापक तेज प्रकास अग्रवाल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. आमचं लक्ष्य हे ट्रेनच्या वेळेमध्ये सुधारणा करण्यावर आहे. त्यामुळए कर्मचाऱ्यांच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या विभागातील ९० टक्के ट्रेन वेळेवर धावत असल्याचे सांगितले. या स्टेशन मास्तरांनी दाखवलेल्या बेफिकिरीमुळे इतरांच्या मेहतनीवर पाणी फिरवले. एवढंच नाही तर रेल्वे वाहतुकीसाठी धोका निर्माण केला, असे त्यांनी सांगितले.