भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हे प्रवासासाठीचे सुरक्षित आणि स्वस्त साधन मानले जाते. मात्र ट्रेनमधून प्रवास करण्यासाठीचे विविध प्रकारचे नियम बनवण्यात आलेले आहेत. त्याच प्रकारे प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहण्याबाबतही एक खास नियम आहे. त्या नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या नियमाबाबत रेल्वेने प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना माहिती नाही आहे. हा नियम काय आहे, ते जाणून घेऊया.
ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोक नेहमी वेळेआधी रेल्वे स्टेशनवर पोहोचतात. मात्र तिकीट घेतल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. तसेच या नियमाचं पालन केलं नाही तर दंड भरावा लागू शकतो. हा नियम काय आहे, ते जाणून घेऊयात.
ट्रेनचं तिकीट घेतल्यानंतर जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलात. तर तिथे थांबण्यासाठी खास नियम आहे. जर तुमची ट्रेन दिवसाची असेल तर तुम्ही ट्रेनच्या निर्धारित वेळेआधी दोन तास रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकता. तसेच जर ट्रेन रात्रीची असेल तर तुम्ही ट्रेनच्या वेळेआधी सहा तास स्टेशनवर येऊ शकता. या वेळेत आल्यास तुम्हाला कुठलाही दंड भरावा लागणार नाही. तसेच ट्रेनमधून उतरल्यानंतरी हाच नियम लागू होतो. तु्म्ही ट्रेनमधून उतरल्यावर दोन तास रेल्वे स्टेशनवर थांबू शकता. तर रात्रीच्या वेळी ट्रेनमधून उतरल्यावर तुम्ही सहा तास स्टेशनवर थांबू शकता. त्यासाठी तुम्हाला तिकीट जवळ बाळगावं लागेल. तसेच ते टीटीईने मागितल्यास दाखवावं लागेल.
जर तुम्ही निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ रेल्वे स्टेशनवर थांबला तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावं लागेल. म्हणजेच जर तुम्ही दिवसा ट्रेनच्या वेळी २ तास आणि रात्री ट्रेनच्या निर्धारित ६ तास वेळेपेक्षा अधिक वेळ स्टेशनवर थांबलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागेल. असं न केल्यास टीटीई तुमच्याकडून दंड वसूल करू शकतात. तसेच प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधताही केवळ २ तास असते, त्यापेक्षा अधिक काळ थांबल्यास तुमच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.