नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीयरेल्वेने आयसोलेशन कोच तयार केले आहेत. बोगीचे आयसोलेशन वार्डमध्ये रुपांतर करताना रेल्वेने मध्यभागी असलेला बर्थ काढून टाकला आहे. तसेच रुग्णाची व्यवस्था ज्या बर्थवर असेल त्या बर्थ समोरील तिनही बर्थ काढले आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 902 वर पोहोचली आहे.
रेल्वेने पूर्णपणे रुग्णाच्या दृष्टीकोनातून हे बर्थ तयार केले आहेत. आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी बाथरूम, जाण्यायेण्याचा रस्ता आणि इतर भागही व्यवस्थितपणे तयार करण्यात आले आहेत. याशिवाय बर्थवर चढण्यासठी आवश्यक असलेल्या सर्व शिड्याही काढण्यात आल्या आहेत.
अमेरिका, चीन आणि इटलीतील परिस्थिती पाहता, भारतासह सर्वच देश कोरोनाचा सामना करण्यासठी युद्ध पातळीवर तयारी करत आहेत. कोणत्या देशात, कोणत्याक्षणी परिस्थिती हाताबाहेर जाईल हे सांगता येणेही अश्यक्य आहे. त्यामुळे, बिकट परिस्थिती आलीच तर तीचा सामना करण्यासाठी सर्वच देश तयारी करत आहेत. यामुळेच मोदी सरकारलाही रेल्वेच्या कोचचे रुपांतर आयसोलेशन वार्डमध्ये करण्याची आवश्यकता भासली आहे. तसे पाहता, इतर बड्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना पसरण्याचा वेग अद्याप फार कमी आहे. कारण येथील सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी वेळ असतानाच पावले उचलायला सुरुवात केली. संपूर्ण देशा लॉकडाउन करणे हाही याचाच एक भाग आहे.
या देशांत कोरोनाने घातलाय सर्वाधिक हाहाकार -
जगातील सर्वच देश सध्या कोरोनाचा सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तेथे 9134 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याशिवाय चीनमध्ये 3295, अमेरिकेत 1704, स्पेनमध्ये 5138, इराणमध्ये 2378, फ्रान्समध्ये 1995 आणि जर्मनीमध्ये 391 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 20 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जगभरातील मृतांचा आकडा 5,97,458वर -
जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 5,97,458 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी 1,33,373 लोक बरे होऊन घरीही परतले आहेत.
असे आणखी तीन लाख कोच तयार केले जाऊ शकतात -
देशातील कोरोना व्हायरसचे संकट पाहता सर्व प्रकारच्या प्रवासी सेवा पुरवणाऱ्या रेल्वे 14 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना रेल्वेने बोगींचे रुपांतर आयसोलेशन वार्डमध्ये केले आहे. यासंदर्भात बोलताना, गरज भासल्यास अशा स्वरुपाच्या आणखी तीन लाख आयसोलेशन कोच तयार करता येऊ शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे.