दोन वर्षांपूर्वीच रेल्वेने लाँच केलेली वंदे भारत एक्स्प्रेस तिचा वेग आणि सेवेमुळे लोकप्रिय झाली. आता रेल्वे त्याच्या पुढचे पाऊल टाकत आहे. ही ट्रेन आता स्लिपर कोचमध्ये येत आहे. महत्वाचे म्हणजे या ट्रेनमध्ये सर्वच्या सर्व डबे हे स्लिपर कोचचेच असणार आहेत.
प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आता रेल्वे ही ट्रेन स्लिपरमध्ये आणण्याची तयारी करत आहे. यासाठी मोठी ऑर्डरही देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने २०० स्लिपर वंदे भारत एक्स्प्रेससाठी टेंडर जारी केले आहेत. या टेंडरमध्ये एक्स्प्रेसचे डिझाईन, मॅन्युफॅक्टरिंग आणि मेंटेनन्सदेखील आहे. रेल्वे वंदे भारत ट्रेन अपग्रेड करत आहे. या टेंडरची मुदत २६ जुलै २०२२ आहे.
वंदे भारत ट्रेन ही वातानुकुलीत असणार आहे. मात्र, आता ही ट्रेन मध्यम आणि दुरच्या ट्रॅकवरही चालविली जाणार आहे. सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर किंवा चेन्नई येथे असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये केले जाईल. पहिली प्री-बिड कॉन्फरन्स 20 मे 2022 रोजी होणार आहे. एक्स्प्रेसच्या डिलिव्हरीची अंतिम मुदत 6 वर्षे 10 महिने असेल. कंपनी या कालावधीत 200 ट्रेन बांधून तयार करेल.
16 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 1 फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 11 थर्ड एसी कोच असतील. 20 कोच असलेल्या स्लीपर ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 15 थर्ड एसी कोच बसवण्यात येणार आहेत. या ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास असणार आहे.