नवी दिल्ली - प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विविध सुविधा या देण्यात येत असतात. रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तप्तर असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुकलीच्या सुटकेसाठी रेल्वे न थांबता तब्बल 200 किमी धावल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीसाठी रेल्वेने ललितपूर ते भोपाळ हे जवळपास 200 किमीचं अंतर पार करून तिची सुखरुप सुटका केली आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील रेल्वेच्या या ऑपरेशनचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या वडिलांनीच तिचं अपहरण केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ललितपूर रेल्वे स्थानकात सोमवारी एक महिला रेल्वे पोलिसांकडे आली. एका व्यक्तीने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेल्याचं सांगितलं.
महिलेने माहिती देताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक व्यक्ती मुलीला घेऊन राप्तीसागर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचं दिसलं. ही गाडी काही वेळापूर्वीच रेल्वेस्थानकातून रवाना झालेली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी याची माहिती झाशी रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला दिली. त्यांनी अपहरण करणारी व्यक्ती फरार होऊ नये म्हणून भोपाळच्या नियंत्रण कक्षाला ट्रेन न सोडण्याची विनंती केली.
ललितपूर रेल्वे स्थानकावरून सुटलेली ही गाडी कुठेही न थांबता सलग भोपाळपर्यंत धावली. त्यानंतर तीन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी आरोपीची अधिक चौकशी केली असता तोच मुलीचा बाप असल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं पत्नीशी भांडण झालं. त्यानंतर तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.