कोरोना व्हायरसच्या प्रकोपामध्येही रेल्वेने आपली सेवा देणे सुरु ठेवले होते. आधीसारखी सेवा मिळत नसली देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवासाचे माध्यम सुरु होते. या काळात रेल्वेने एक महत्वाची सेवा बंद केली होती. ती आता पुन्हा सुरु केली आहे.
कोरोनामुळे रेल्वेने लिनन आणि पडद्यांची सेवा हटविली होती. अनेक प्रवाशांनी त्याचा पुनर्वापर केल्याने कोरोना पसरण्याची भीती होती. यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आता ती टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहे. उत्तर रेल्वेने आतापर्यंत ९२ ट्रेनमध्ये पडदे आणि २६ ट्रेनमध्ये लिनन सेवा सुरु केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता प्रवाशांना बेडरोल, ब्लँकेट, उशा, खिडक्यांवर पडदे आदी सेवा मिळू लागणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास पूर्वीसारखा आणि आरामदायक होणार आहे. यासाठी वॉशिंग सेंटर आणि अन्य सामुग्री पुन्हा उपलब्ध करण्यास सुरुवात झाली आहे.
दोन वर्षे वापरात नसल्याने खराब झालेले कापड बदण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी स्टोअर विभागाला लिनन आणि बेडरोलच्या खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हे जसजसे उपलब्ध होत आहेत, तसतसे ते ट्रेनमध्ये पुरविण्यात येत आहेत. यामुळे य़ा सेवेसाठी काही वेळ लागणार आहे. उर्वरित गाड्यांमध्ये पडदा आणि बेडरोलची सेवा पूर्ववत करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, विक्रेत्यांकडून पुरवठा मिळाल्यानंतर उर्वरित गाड्यांमध्ये ही सेवा पूर्ववत केली जाईल.