भारतीय रेल्वेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. NWREU म्हणजेच उत्तर पश्चिम रेल्वे कर्मचारी युनियनने ट्रेनची वाहतूक ठप्प करण्याची तयारी केली आहे. देशभरात दीर्घकाळापासून ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्किमची मागणी केली जात आहे. या मागणीवर रेल्वे कर्मचारीसुद्धा आरपारच्या लढाईची तयारी करत आहेत. NWREUने केलेल्या दाव्यानुसार फेब्रुवारी महिन्यात ते रेलरोको संपावर जाणार आहेत. या संपामध्ये NWREU देशभरातील इतर सर्व विभागही सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी NWREU जुन्या पेन्शनची मागणी समोर करून रेल्वे वाहतूक ठप्प करण्याची तयारी करत आहे. संपासाठी फेब्रुवारी महिना निश्चित करण्यात आला आहे. मात्र तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच प्रस्तावित रेल्वे संपाबाबत युनियनचं सरकारशी कुठलंही बोलणं झालेलं नाही.
NWREU चे सरचिटणीस मुकेश माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार संपाच्या रणनीतीसह ८ ते ११ जानेवारीपर्यंत NWREU साखळी उपोषण करण्यात येणार आहे. यादरम्यान, फेब्रुवारी महिन्यात रेल्वे संपाबाबत रणनीती तयार करण्यात येईल. कर्मचारी युनियनने सांगितले की, ओपीएससाठी सरकारला अर्ज विनंत्या करून आम्ही थकलो आहोत. आता आमच्याकडे संप करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. मात्र हा संप होण्यापूर्वी सरकार काहीतरी तोडगा काढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र जर संप झाला तर हजारो ट्रेनची वाहतूक विस्कळीत होऊ शकते.