नवी दिल्ली - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश काळापासून सुरू असलेली एक परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमंत्रालय आणि देशभरातील रेल्वे जीएम ऑफिसमध्ये आरपीएफ जवान तैनात असतो. या जवानाचं काम केवळ सलाम ठोकण्याचं असतं. हीच प्रथा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.
भारतीय रेल्वेमध्ये ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. मात्र रेल्वे मंत्र्यांनी ही सामंतशाहीचं प्रतीक असलेली ही प्रथा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सॅल्युटची तुलना आपल्या प्रतिष्ठेशी करतात. रेल्वे मंत्रालयामध्ये रेल्वेमंत्री आणि बोर्डाच्या सदस्यांसाठी वेगवेगळे गेट आहेत. तिथेत आरपीएफचा सलाम ठोकणारा जवान तैनात असतो.
हीच व्यवस्था रेल्वेच्या सर्व विभागीय ऑफिसमध्ये होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रथा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणली होती. दुसरीकडे भारतीय रेल्वेमध्ये सीनियर सिटिझन्सना तिकिटांवर मिळणारी सवलत पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. ही सवलत सुरू न केल्याने रेल्वेला गेल्या काही दिवसांपासून टीकेचा सामना करावा लागत होता.