Vande Bharat Sadharan Train: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ही आताच्या घडीला देशातील लोकप्रिय ट्रेन आहे. आतापर्यंत देशभरात २५ हून अधिक मार्गांवर वंदे भारतची रेल्वेसेवा सुरू आहे. यात आणखी भर पडणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार काही ठिकाणी ८ तर काही ठिकाणी १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटांमुळे अनेक प्रवाशी इच्छा असूनही या ट्रेनने प्रवास करू शकत नाहीत. सामान्य प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले असून, वंदे साधारण ट्रेनची निर्मिती केली जात आहे. या ट्रेनचा पहिला लूक समोर आला असून, या ट्रेनचे तिकीट दर कमी असतील, तसेच अन्य प्रकारच्या सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात असू शकतील, असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत साधारण ट्रेनसाठी डबे बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ट्रेनचे डबे चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केले जात आहेत. या डब्यांची पूर्ण निर्मिती काही महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
वंदे साधारण ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा मिळणार?
मीडिया रिपोर्टनुसार, वंदे भारत साधारण ट्रेनमध्ये २४ कोच असतील. बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या वैशिष्ट्यांची रचना केली जाईल. यासोबतच ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय ऑटोमॅटिक डोअर सिस्टिमची सुविधाही उपलब्ध होणार आहे. वंदे भारत साधारण ट्रेनची सर्वांत खास गोष्ट म्हणजे त्यांचा वेग मेल आणि एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल. त्यासोबतच थांबेही कमी असतील. यामुळे वेगवान प्रवासासह आधुनिक सोयी-सुविधा प्रवाशांना मिळतील, असे सांगितले जात आहे.
वंदे भारत साधारण ट्रेनचे तिकीट दर किती असतील?
याबाबत बोलताना रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, वंदे भारत आणि साधारण वंदे भारत ट्रेनमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही ट्रेन शताब्दी आणि जनशताब्दीसारखी असेल. शताब्दी ट्रेन सुरू झाली तेव्हा तिचे तिकीट दर जास्त होते, पण त्यानंतर सर्वसामान्यांसाठी रेल्वेने जनशताब्दी ट्रेन सुरू केली, ज्याचे तिकीट दर कमी होते. रेल्वेने ही ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी बनवली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत प्रकारातील ट्रेनमध्ये प्रवास करता येईल. यासोबतच प्रवशांना ट्रेनमध्ये सर्व सुविधा मिळू शकतात. या ट्रेनचे दर वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा खूपच कमी असेल, असे म्हटले जात आहे. सध्या तिकीट दरांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वंदे भारत साधारण ट्रेन खास करून सर्वसामान्यांसाठी बनवली जात आहे.