Balasore Train Accident: ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनची मालगाडीला धडक लागून 285+ प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. या अपघातानंतर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वेकडून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.
तिकीट न पाहता नुकसान भरपाई दिली जाईलयाबाबत अधिक माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सरसकट सर्व मृत प्रवाशांच्या वारसांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही भरपाई मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेकडून 10 लाखांची मदतअपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.