नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) 13 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांची पोस्टिंग त्यांच्या घरापासून बऱ्याचवेळा लांब असते, ही त्यांच्यासाठी एकप्रकारे समस्या असते. त्यामुळे कर्मचारी आपल्या घराजवळ बदली होण्यासाठी प्रयत्न करत राहतात. पण, ते खूप कठीण असते. मात्र आता बदलीचे काम सहज होणार आहे.
रेल्वे बोर्डाकडून यासंदर्भात एक पॉलिसी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे 13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. 15 ऑगस्ट 2022 पासून देशभरात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. रेल्वेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्याही होतात. फॅक्टरी कर्मचार्यांची नियमित बदली सहसा कार्यशाळेतच होते.
ज्या विभागात कर्मचाऱ्याचे काम असते, अशाच विभागात कर्मचाऱ्यांची बदली होते. मात्र एखाद्या कर्मचाऱ्याला आंतर विभागीय बदली हवी असेल तर त्यात मोठी अडचण असते. मात्र, जर एखादा कर्मचारी म्युच्युअल बदली करणारा मिळाला तर हे काम सोपे होते. पण, तसे झाले नाही तर ते फार अवघड काम होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदलीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2022 (सोमवार) पासून ट्रान्सफर मॉड्यूल लागू केले आहे.
या अंतर्गत सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) या रेल्वे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या संस्थेने कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचे मॉड्यूल तयार केले आहे. त्याला एचआरएमएस असे नाव देण्यात आले आहे.रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आंतर विभागीय बदलीचे सर्व अर्ज याद्वारे दाखल केले जातील. याशिवाय ज्यांचा बदलीचा अर्ज आधीच प्रलंबित आहे, तोही त्यावर अपलोड केला जाईल.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या मॉड्यूलच्या अंमलबजावणीमुळे बदलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. याचबरोबर, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बदलीची वेळ येते, तेव्हा तो एचआरएमएसमध्ये ऑनलाइन अर्ज करू शकेल. एकाच जागेसाठी दोन अर्ज आल्यास पहिल्या अर्जास प्राधान्य दिले जाईल. पर्यवेक्षक, शाखा अधिकारी आणि कर्मचारी विभागाचे अधिकारी देखील कर्मचाऱ्यांच्या अर्जावर त्यांचे मत मांडू शकतील. परंतु बदलीचा अंतिम निर्णय फक्त डीआरएम किंवा एडीआरएमचाच असेल.