Indian Railways : भारतात विना तिकीट रेल्वेने अनेक लोक प्रवास करतात. अशा प्रवाशांमुळे रेल्वेला फक्त तोटा होत नाही, तर गाड्यांमधील वाढत्या गर्दीमुळे सहप्रवाशांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी रेल्वे वेळोवेळी तिकीट तपासणी मोहीमही राबवते. मध्य रेल्वेचे असे चार टीटीई आहेत, ज्यांनी एका वर्षात तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून सुमारे चार कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये मुंबई विभागातील सुनील नैनानी यांनी सर्वाधिक दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. 1 एप्रिल ते 13 ऑक्टोबर 22023 दरम्यान, सुनील नैनानी यांनी 10,428 प्रवाशांकडून 1,00,02,830 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले. तर, वर्षभरात नैनानी यांनी 18,413 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1.62 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय, भीम रेड्डी यांनी 11,178 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एमएम शिंदे यांनी 11,145 तिकीट प्रवाशांकडून 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. तर, आरडी बहोत यांनी 11,292 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
एका दिवसात 16 लाख रुपयांचा दंड मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सोमवारी कल्याण रेल्वे स्थानकावर पथकासह तिकीट तपासणी मोहीम राबवली. या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान 4438 लोकांकडून दिवसभरात 16.85 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन सन्मानपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले.