मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार सरकारने १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली होती, मात्र परिस्थिती अजूनही तशीच आहे. या आंदोलनात रेल्वेच्या मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
“रेल्वे परिसरात झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्ये २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलकांनी रेल्वेचे ५० डबे आणि ५ इंजिने जाळली, ज्यांचं आता पूर्णपणे नुकसान झालं आहे. याशिवाय आंदोलकांनी प्लॅटफॉर्म, कम्प्युटर्स आणि इतर अनेक उपकरणांचे नुकसान केले आगे. या आंदोलनामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम प्रभात कुमार म्हणाले यांनी दिली.
बिहारच्या ट्रेन सेवा रद्दबिहारमधील रेल्वे सेवा शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत तसंच रविवारीही पहाटे ४ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले, तर या आंदोलनामुळे आतापर्यंत ३५० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच तेथे उपस्थित असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने नुकसान करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.