ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणा-या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उदघाटन झाले. दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. ट्रेनच्या एकूण सहा डब्ब्यांवर सौर ऊर्जेचे 16 पॅनल बसवण्यात आले आहेत. मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत या सोलार पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी 54 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलार पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, ही ट्रेन 72 तास बॅटरीवर चालू शकते. मागच्यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढच्या पाचवर्षात रेल्वे 1 हजार मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करेल अशी घोषणा केली होती. सोलार पॅनलवर चालणा-या डिझेल इलेक्ट्रीकल युनिटच्या ट्रेन या योजनेचा एक भाग आहे. स्वच्छ आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उदघाटनाच्यावेळी सांगितले.
आणखी वाचा
शहरी भागात प्रथम सौर ऊर्जेवर ट्रेन चालवल्या जातील. त्यानंतर लांब पल्ल्याच्या ट्रेन्समध्ये सोलार पॅनल्स बसवण्यात येतील असे रवींद्र गुप्ता यांनी सांगितले. ते रेल्वे बोर्डाचे सदस्य आहेत. पुढच्या काही दिवसात आणखी 50 डब्ब्यांवर सोलार पॅनल्स बसवण्याची योजना आहे. संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारतीय रेल्वेचे 700 कोटी रुपये वाचतील असे रवींद्र गुप्ता यांनी सांगितले. सौर ऊर्जेमुळे पुढच्या 25 वर्षात रेल्वेला 5.25 लाख लिटर डिझेल वाचवता येईल. याच काळात प्रत्येक ट्रेनवर 3 कोटी रुपये वाचतील. सौर ऊर्जेमुळे 25 वर्षात 1350 टनांनी कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.
रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग
ज्या प्रवाशांना विमानाचं तिकीट बुकिंग करायचं आहे अशा प्रवाशांसाठी एक सोपा पर्याय रेल्वेकडून मिळणार आहे. प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे. रेल्वेकडून या आठवड्यात नवं मोबाइल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या नव्या अॅपमुळे प्रवाशांना अनेक सोयी सुविधांचा लाभ घेता येइल.