Ayodhya Vande Bharat Express Train: अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यावेळेस दोन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. या दिमाखदार सोहळ्याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यातच आता भारतीय रेल्वेनेही अयोध्येसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची योजना आखली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली ते अयोध्या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊ शकते. या महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या मार्गावर ट्रायल रन घेतली जाऊ शकते. रेल्वे मुख्यालयात एका बैठकीत नवी दिल्ली ते अयोध्या मार्गावरील वंदे भारत ट्रेन चालवण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनचे लोकार्पण करू शकतात. मात्र, याबाबत निश्चित तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.
अयोध्येतून देशभरात वंदे भारत ट्रेनची सेवा
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर राम मंदिर दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अयोध्या नगरीत येतील. संपूर्ण देशभरातून रामदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध शहरांतून अयोध्येसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विचार भारतीय रेल्वे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेचे अधिकारी सातत्याने अयोध्या सेक्शनचा आढावा घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, नवी दिल्ली ते अयोध्या या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू केली, तर या मार्गावरील थांबे, तिकीट दर, वेळापत्रक याबाबत योजना आखली जात आहे. यावर सविस्तर आणि सखोल चर्चा केली जात आहे, असे सांगितले जात आहे. देशातील विविध भागांतून वंदे भारत ट्रेन अयोध्येसाठी चालवली गेली तर भाविकांची मोठी सोय होऊ शकेल. प्रवास जलद, आरामदायी आणि सुखकर होऊ शकेल, अशी चर्चा आहे.