Indian Railways: रेल्वे गाड्यांमध्ये एसीची सुविधा नसलेले म्हणजेच सर्वसामान्य डबे (General Class Train Coach) आता इतिहास जमा होणार आहेत. रेल्वे मंत्रालयानं दूरच्या अंतरावरील रेल्वे प्रवास अधिक सुखदायक करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं पाऊल टाकलं असून आता जनरल डबे देखील वातनुकूलीत होणार आहेत. याशिवाय हे नवे इकोनॉमी एसी कोच नव्या रुळांवर अत्याधुनिक पद्धतीनं अधिक वेगानं धावणार असून १८० किमी प्रतितास वेगानं ते धावू शकतात असा दावा करण्यात आला आहे. अधिक वेग आणि वातानुकूलित प्रवास अशी सेवा आता जनरल डब्ब्यातील प्रवाशांना मिळणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच भारतीय रेल्वेला अधिक सुविधा आणि लोकप्रिय करण्याचा संकल्प केला होता. याच दृष्टीकोनातून जनरल डब्ब्यांमध्येही एसीची सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेनं केला आहे. येत्या महिन्यापासून या योजनेला सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रेल्वे मंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या जनरल सेकंड क्लास डब्ब्यात जवळपास १०० प्रवाशांची आसन क्षमता आहे. हे डबे बनवण्यासाठीचा खर्च २.२४ कोटी रुपये प्रति कोच असा येतो. तर नव्या डब्ब्यांमध्ये आसन क्षमता अधिक असणार आहे. तर ते १३० किमी प्रतितास वेगानं धावू शकणार आहेत. जुने नॉन-एसी डब्बे सध्या सर्वाधिक ११० किमी प्रतितास वेगानं धावण्याची क्षमता ठेवतात.
रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर आता वेगानं काम केलं जात असून नवे डबे आणखी स्वस्त असणार आहेत. प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. नव्या डब्ब्यांमध्ये १२५ आसन क्षमता असण्याची शक्यता आहे. तर आरक्षित डब्ब्यांमध्ये सेंसरयुक्त ऑटोमॅटिक दरवाजे खुले आणि बंद होण्याची सुविधा असणार आहे. फर्स्ट क्लास एसीपासून ते जनरल क्लास डब्ब्यांपर्यंतचे सर्व डब्यांची निर्मिती पंजाबच्या कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये केली जात आहे. राजधानी, शताब्दी आणि वंदे भारतसारख्या प्रीमिअर रेल्वे गाड्यांसह इतर रेल्वे गाड्यांमध्ये कोविड संकटाआधी वापरले जाणारे अनारक्षित कोच आता आरक्षित असणार आहेत. तसंच वातानुकूलित असणार आहेत.