नवी दिल्ली : शताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस आणि गतिमान एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय रेल्वेकडून या एक्स्प्रेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट दरात कपात करण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी भारतीय रेल्वेने एक योजना आखली असून एक्स्प्रेसच्या तिकिट दरात जवळपास 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.
स्वस्त आणि मस्त सेवा मिळत असल्याने अनेक प्रवासी रोडवेज आणि एअरलाइन्सकडे धाव घेत आहेत. यालाच टक्कर देण्यासाठी भारतीय रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस आणि गतिमान एक्स्प्रेसचे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवासी याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आता 25 टक्के तिकीट दरात सवलत दिल्यानंतर याचा फायदा रेल्वेला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, ज्या एक्स्प्रेसमध्ये निम्मा सीट खाली असतात. त्या एक्स्प्रेसमध्ये ही सवलत दिली जाणार आहे. वातानुकूलित आणि एक्सक्लुझिव्ह चेअरकार तिकीट दरात ही सवलत मिळणार आहे. तसेच, आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क आणि इतर शुल्क वेगळे आकारले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांत शताब्दी, गतिमान आणि तेजस एक्स्प्रेस यासारख्या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक सीट खाली असल्याचे आढळले होते. त्यानंतर सवलत देऊन प्रवाशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात येणार आहे. यामाध्यमातून रेल्वेच्या महसुलात वाढ होईल, असेही या अधिकाऱ्यांने सांगितले.
दरम्यान, ज्या एक्स्प्रेसमध्ये 25 टक्के सवलत दिली जाणार आहे, त्या एक्स्प्रेसमधील इतर सवलती मिळणार नाहीत. तसेच, भारतीय रेल्वेने कमी तिकीटविक्री होणाऱ्या गाड्यांची नावे 30 सप्टेंबरपर्यंत सूचित करण्यास सर्व विभागीय व्यवस्थापकांना सांगितले आहे.