नवी दिल्ली - कोरोनाकाळात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीचे नियम अधिकाधिक कडक करण्यात आले होते. दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे रेल्वेने आपल्या कोविड-१९ संबंधीच्या नियमांना सहा महिन्यांची किंवा पुढील आदेशापर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता रेल्वे प्रवासामध्ये किंवा रेल्वेच्या परिसरात विनामास्क फिरताना आढळल्यास अशा व्यक्तीकडून दंड वसूल करण्याच्या नियमालाही मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासादरम्यान विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून ५०० रुपये दंड वसूल केला जाईल. (Penalties for non-use of masks on train journeys will be extended, passengers without masks will be fined Rs 500)
भारतीय रेल्वेकडून यासंदर्भात एक नवे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिफिकेशनचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या नोटिफिकेशनमधील मार्गदर्शक सूचनांना १६ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
जुन्या नोटिफिकेशननुसार रेल्वेच्या परिसरात मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाईच्या करण्यात आलेल्या नियमाची मुदत ही या महिन्यातील १६ तारखेला संपत होती. दरम्यान, या नियमाचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला असता कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सध्या हा नियम कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आहे.