नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वेची आर्थिक हानी पाहता केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वेच्या कर्मचार्यांच्या भत्त्यात कपात करण्याचा विचार करीत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रवासी भत्ता आणि ओव्हरटाईम ड्युटीसाठी (Travel Allowance and overtime Allowance) देण्यात येणाऱ्या भत्त्यात 50 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने याबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कर्मचार्यांचा ओव्हरटाईम व प्रवासी भत्ता कमी करण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेता येईल. यापूर्वी ऑगस्टमध्ये असा अंदाज वर्तविण्यात येत होता की, भारतीय रेल्वे 2020-21 वर्षासाठी कर्मचार्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन रोखण्याचा विचार करीत आहे. मात्र, त्यानंतर सरकारने हे अंदाज फेटाळून लावले होते. याबाबतचे वृत्त फेटाळून लावत असा कोणताही प्रस्ताव नाही, असे सोशल मीडियावरून सरकारने म्हटले होते.
दरम्यान, भारतीय रेल्वेमध्ये 13 लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि सुमारे 15 लाख निवृत्तीवेतनधारकही आहेत. रिपोर्टनुसार, रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी 2020-21मध्ये 53,000 कोटी रुपयांच्या निवृत्तीवेतन खर्चाची पूर्तता करण्यासाठी वित्त मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
यापूर्वी अशीही बातमी होती की, रेल्वे 1 डिसेंबरपासून कोविड -19 स्पेशल ट्रेनसह सर्व गाड्या थांबवणार आहेत. परंतु, रेल्वे मंत्रालयाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या वृत्ताबाबत रेल्वेने म्हटले आहे की, सध्या सरकारची अशी कोणतीही योजना नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. जर तुम्हालाही असा कोणताही मेसेज आला तर त्याकडे लक्ष देऊ नका.